माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दरवर्षी प्रतिटन २०० रुपये खोडकी (कांडे) बिल दिले जाते. जून महिन्यामध्ये नवीन ऊस लागवड करण्यासाठी व शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला हे खोडकी पेमेंट देण्याची माळेगावची परंपरा आहे. ही परंपरा कायम राहावी आणि ऊस उत्पादक सभासदांना पैसे मिळावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली. याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कारखान्याचे माजी संचालक सुरेश खलाटे, तानाजी पोंदकुले, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त गणपत देवकाते, राजेंद्र काटे, श्रीहरी येळे, गौरव जाधव, सुशीलकुमार जगताप, नितीन तावरे, इंद्रसेन आटोळे, अजिंक्य वाघमोडे, अमित कोकरे, सिद्धार्थ गावडे, विक्रम आटोळे, विनय शेळके, रियाज सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी युगेंद्र पवार यांच्यासह शेतकऱ्यांनी कांडे पेमेंटसाठी केलेल्या मागणीचे निवेदन प्रशासनाला प्राप्त झाले आहे. ते निवेदन संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत चर्चेला ठेवले जाईल, अशी माहिती दिली आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या प्रशासनाने गेल्यावर्षी गळीत हंगामात उसाला एफआरपी ३२६९ रुपये असतानाही प्रति टन ३३०० रुपये शेतकऱ्यांना अदा केलेले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी कारखान्याचे अनेक सभासद व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


















