कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामासाठी विनाकपात पहिली उचल ४,५०० रुपयांऐवजी ४,२०० रुपये घेण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दर्शवली आहे. आम्ही दोन पावले मागे आलो आहोत, आता कारखानदारांनी दोन पावले पुढे यावे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.ऊसदराच्या मागणीसाठी पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी टोलनाक्यावर मंगळवारी सकाळपासून चक्काजाम आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाला ३४ तासांहून अधिक काळ उलटूनही राज्य सरकारने दखल न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची सभा घेतली.यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, आपल्या आंदोलनाची ना सरकारला चिंता आहे, ना साखर कारखानदारांना. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना सरकार आणि कारखानदार मात्र निवांतपणे घरात बसून आहेत.
तोडग्याची जबाबदारी मंत्री मुश्रीफ यांच्यावर : मुख्यमंत्री
ऊसदराच्या प्रश्नावर राज्य सरकार शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात मध्यस्थी करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर चर्चेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या आंदोलनामुळे अखेर शेतकऱ्यांचेच नुकसान होत असल्याने त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
आंदोलनाचे पुढील टप्पे
ऊसदराचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. आंदोलनाच्या पुढील टप्प्यांमध्ये गुरुवारी सर्व साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरांसमोर शिमगा आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच आजपासून कारखान्यांना ऊसाचे एकही कांडे पाठवले जाणार नाही. तोडगा न निघाल्यास शुक्रवारी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांत बंद पुकारण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दूध, भाजीपाला रोखण्याचा निर्णय मागे
यावेळी राजू शेट्टी यांनी आंदोलनाच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘‘पुणे आणि मुंबईला जाणारा भाजीपाला व दूध आजपासून रोखण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.’’


















