कोल्हापूर : ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी कारखान्यांची आर्थिक परिस्थिती मांडत आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले आहे. ऊसदराच्या प्रश्नावर चर्चा करण्याची आपली तयारी आहे; मात्र आंदोलन कुठेतरी थांबले पाहिजे, अशी भूमिका मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
मुश्रीफ म्हणाले, गेल्या दहा ते बारा वर्षांत कोणत्याही साखर कारखान्याचे कर्ज कमी झालेले नाही. उलट कारखान्यांवरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत आहे. शेतकऱ्यांना उसाचे बिल वेळेवर देण्यासाठी अनेक कारखान्यांना कर्ज काढावे लागते. ही वस्तुस्थिती माजी खासदार राजू शेट्टी यांनाही माहिती आहे. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती आणि शेतकऱ्यांना मिळणारा ऊसदर यांचा विचार करून मार्ग काढण्याची गरज आहे.
साखरेच्या दरात वाढ झाली असली, तरी त्याचा फायदा सर्व साखर कारखान्यांना झालेला नाही. साखरेच्या दरवाढीचा लाभ काही प्रमाणात व्यापाऱ्यांना झाला, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले. त्यामुळे केवळ साखरेचे दर वाढले म्हणून कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, असे म्हणता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
राजू शेट्टी यांना उद्देशून मुश्रीफ म्हणाले, ‘‘माझी शेट्टी यांना विनंती आहे की, आपण ऊसदराच्या प्रश्नावर चर्चा करू. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मार्ग काढण्याची तयारी आहे. मात्र, आंदोलन आता कुठेतरी थांबले पाहिजे.’’
दरम्यान, आंदोलन लांबल्यास त्याचा परिणाम ऊसतोड आणि वाहतूक व्यवस्थेवर होण्याची शक्यता मुश्रीफ यांनी व्यक्त केली. आंदोलन सुरूच राहिले, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड मजूर जिल्ह्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामावरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
ऊसदराचा प्रश्न चर्चेतून सोडविण्याची भूमिका मुश्रीफ यांनी मांडली असली, तरी शेतकरी संघटनेची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















