मुंबई : राज्यात यंदा एक हजार लाख टन ऊस गाळपाला येईल, असा अंदाज कृषी विभाग आणि ‘मिटकॉन’ने व्यक्त केला असला तरी राज्यातील बहुतांश कारखानदारांनी त्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पुन्हा ऊस उपलब्धतेचा फेरआढावा घेऊन नव्याने माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यंदा पावसाची तूट आणि अन्य कारणांनी उसाचे क्षेत्र कमी होण्याबरोबरच उताऱ्यात मोठी घट होण्याचा अंदाज बुधवारी (ता. ९) मंत्रिसमितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
राज्यात ‘एल निनो’मुळे पावसाची मोठी तूट आहे. त्यामुळे राज्यभरातील उसाच्या पिकावर मोठा परिणाम होणार आहे. मुळात ऊस हे पाण्यावरील पीक असल्याने उताऱ्यातही मोठी घट होऊ शकते. गाळप हंगामाच्या आढावा बैठकीत कृषी विभागाच्या अंदाजानुसार १५.४८ तर ‘मिटकॉन’च्या अंदाजानुसार १५.४३ लाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. या उसाची सरासरी उत्पादकता हेक्टरी ८१ ते ८८ टन राहील, असेही सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले. कृषी आणि ‘मिटकॉन’च्या अंदाजानुसार राज्यात अनुक्रमे १२३८.४० लाख आणि १२५० लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. मात्र बैठकीत या आकडेवारीला आक्षेप घेण्यात आला.
राज्यात पावसाने ओढ दिल्याने गाळप हंगाम १०० ऐवजी ८० दिवस चालण्याची शक्यता असून उत्पादनात मोठी घट होणार आहे. कृषी विभाग आणि मिटकॉनने वर्तविलेल्या अंदाजानुसार होणारी हेक्टरी ८० ते ८१ टन उत्पादकता ५० टनांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ११.२५ टक्के संभाव्य उतारा कमी होणार आहे. परिणामी, अंदाज वर्तविल्याप्रमाणे १११ लाख टन साखर उत्पादित होणार नाही, असा दावा बैठकीत करण्यात आला. त्यामुळे ऊस उपलब्धता, क्षेत्र आणि सरासरी उत्पादनाचा फेरआढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यानुसार हंगाम सुरू होण्याआधी सुधारित अंदाज सादर केला जाणार आहे.
राज्यभर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम होईल, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे फेरआढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार फेरआढावा घेऊन साखर उत्पादनाचे अंदाज व्यक्त करण्यात येतील, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.


















