सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या शेती व जलसिंचन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेत यंदाच्या हंगामात एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेतलेल्या २१ शेतकऱ्यांची ‘ऊस भूषण’साठी निवड करण्यात आली. त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला. ‘व्हीएसआय’च्या सहकार्याने राबविलेल्या ‘लक्ष्य १०० टनाचे’ या उपक्रमामुळे अनेक शेतकरी एकरी १०० टनांहून अधिक उत्पादन घेऊ लागले आहेत, असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कारखान्याशी जोडून ठेवण्यासाठी यंदा नवीन लकी ड्रॉ योजना सुरू करण्यात आली. कारखान्याला संपूर्ण ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या लकी ड्रॉ योजनेत २८ शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली. समारंभात २१ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राजारामबापू ऊसभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आपला ऊस कारखान्यास घालणाऱ्या शेतकऱ्यांमधून कारखान्याच्या प्रत्येक गटांमधून ४ असे २८ शेतकरी लकी ड्रॉद्वारे निवडण्यात आले. सर्वांना प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे, प्रदिप कुमार पाटील उपस्थित होते.


















