सांगली : क्रांतिअग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करारांचा प्रारंभ अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते झाला. यावेळी वाहतूकदारांशी प्रतिनिधिक स्वरुपात करार पूर्ण करण्यात आले. आगामी गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व वाहतूकदारांनी सक्षम मजूर टोळ्या तयार कराव्यात, जेणेकरून ऊस वेळेत व जास्तीत जास्त प्रमाणात कारखान्याकडे पोहोचवता येईल. तसेच कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करूनच मजूर टोळ्यांशी व्यवहार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, वाहनधारक व ऊसतोड मजुरांच्या हितासाठी कारखाना प्रशासन नेहमीच पुढाकार घेत आहे. शासनाने तीन वर्षांपूर्वी ऊस तोडणी मजुरी दरात ३४ टक्के वाढ केल्यानंतर कारखान्याने राज्यात पहिल्यांदाच वाहतूकदारांना १५ टक्के आणि तोडणी मजुरांना ३५ टक्के वाढ लागू केली होती. तसेच गतवर्षीही वाहतूक दरात १० टक्के वाढ देण्यात आली होती. यंदाही लवकर करार करून अॅडव्हान्स देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.


















