सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त हुतात्मा कारखान्याच्यावतीने ऊस पीक परिसंवाद झाला. कारखान्याच्या अध्यक्षा जयश्री अहिर अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जर्मनीचे शास्त्रज्ञ अलेक्झांडर सोमेर यांनी ‘उसातील अन्नद्रव्ये व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. ऊस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनी एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन शक्य आहे हे लक्षात घेऊन काम करण्याचे आवाहन सोमेर यांनी केले. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उसाच्या वाढीवर विपरित परिणाम होत असून उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
ऊसतज्ज्ञ व कीटकशास्त्रज्ञ डॉ. अंकुश चोरमुले यांनी लागवडपूर्व मशागत, दर्जेदार बियाणांची निवड, खत व पाणी व्यवस्थापन, तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर याबाबत सविस्तर माहिती दिली. अमोल आंधळे यांनी उसातील कीड व्यवस्थापन, बेणे प्रक्रिया आणि योग्य कीटकनाशकांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. गौरव नायकवडी यांनी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून एकरी ऊस उत्पादन वाढविल्यासच ऊसशेती अधिक फायदेशीर ठरेल. हुतात्मा कारखाना ऊस उत्पादकांना सर्वाधिक दर देण्याची परंपरा कायम ठेवेल, असे सांगितले. केदार नायकवडी, हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, संचालक विशाखा कदम, माजी अध्यक्ष महादेव कांबळे, सचिव मुकेश पवार, संजय अहिर, विलास थोरात, जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी, सरपंच संदेश कांबळे उपस्थित होते.


















