सांगली : वैभव नायकवडींच्या राजीनाम्याबाबत कायदेशीर पूर्ततेपर्यंत हुतात्मा काखान्यासमोर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

वाळवा : हुतात्मा साखर कारखान्यासमोर गेल्या ४७ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर वैभव नायकवडी यांनी राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत त्यावर कायदेशीर बाबींची पूर्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे आंदोलक नेत्यांनी जाहीर केले आहे. अण्णांचे ज्येष्ठ चिरंजीव किरण नायकवडी आणि नातू गौरव, केदार नायकवडी यांनी सभासद, शेतकरी यांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. दरम्यान, कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांना सर्व सह्यांचे अधिकार देण्यात आले असून १६ संचालक कारभार पाहत आहेत. कारखान्यात लागेल त्या जागी कर्मचारी भरती केली जात असून सुमारे ९०० अर्ज आले आहेत. यामध्ये कार्यक्षेत्रातील गरजूंना प्राधान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या गळीत हंगामात साडेतेरा टक्के साखर उतारा आणि साडेसहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

गेले दीड महिना हुतात्मा साखर कारखान्यासमोर, अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी कारखान्यावर केलेले कर्ज भागवून राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू राहिले. आता नायकवडी यांनी राजीनामा दिला असला तरी, त्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. दरम्यान, हुतात्मा पतसंस्थेचे अध्यक्ष अजित वाजे यांनी राजीनामा दिला आहे. ते वैभव नायकवडी यांचे निकटवर्तीय मानले जातात. हुतात्मा कारखान्याचा पेट्रोलपंप बझारला चालवायला दिला होता, त्यावरही अनेक आरोप केले जात होते. तो पुन्हा कारखान्याकडे घेण्यात आला आहे. तसेच लवकरच सभासद साखर विक्री दुकान बझारकडून कारखान्याकडे वर्ग करण्याची प्रक्रिया केली जात आहे. याबाबत किरण नायकवडी म्हणाले की, जोपर्यंत राजीनाम्याच्‍या सर्व प्रक्रिया रीतसर पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमचा अजिबात विश्वास नाही. हुतात्मा संकुलातील सर्वच संस्था अक्षरशः लुबाडल्या आहेत, त्याचा हिशेब निश्चित केला जाणार आहे. सध्या कारखान्याच्यावतीने मोठ्या प्रमाणात ऊसनोंदणी केली जात असून भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत, गळीत हंगाम यशस्वी करण्याच्यादृष्टीने आतील कामे गतीने सुरू करण्यात आली आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here