सांगली : महाकाली बचाव कृती समिती व कामगार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाकाली साखर कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी बैठक झाली. यावेळी मिलिंद कोरे यांनी मार्गदर्शन केले. बाळासाहेब पाटील, आप्पासाहेब कोळेकर, राजेंद्र पाटील, सुनील भोसले, तात्यासाहेब माळी, विजय शेजाळ, रवींद्र गाडवे, गजानन कांबळे, मनोज देसाई, ओंकार पाटील, कामगार नेते हनुमंत कुंभारकर, उद्धव पाटील, बाजीराव मोरे, आत्माराम बसवर आणि कल्लापा फुटाणे यांची उपस्थिती होती. सर्वांनी एकजुटीने व ताकदीने पुढाकार घेऊन साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन मिलिंद कोरे यांनी यावेळी केले. तर संदीप गिड्डे-पाटील यांनी महाकाली साखर कारखाना हा केवळ उद्योग नसून हजारो शेतकरी, कामगार, वाहतूकदार व व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. कारखाना बंद पडल्याने तालुक्याच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे, श्रीरंग कोरे, दादासाहेब ढेरे, अविराजे शिंदे, भानुदास भोसले, पंडित माळी आणि युवराज ओलेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविणे गरजेचे असून त्या माध्यमातूनच अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत असे सांगण्यात आले. कामगार सध्या आर्थिक अडचणीत आहेत. थकीत वेतन आणि रोजगाराच्या असुरक्षिततेच्या गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या या कारखान्यामुळे कामगारांचे भविष्य अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले आहे. या बैठकीत कामगारांनी आर्थिक गैरव्यवहार आणि चुकीच्या व्यवस्थापन धोरणांमुळे कारखाना बंद पडल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. कारखाना बंद झाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगण्यात आले. बैठकीस विक्रम कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. गजानन कोठावळे यांनी आभार मानले.


















