सांगली : ऊसदरासाठी सन २००९ मध्ये करण्यात आलेल्या एफआरपीच्या कायद्यानेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि खासदारकीसाठी राजू शेट्टी यांनी या कायद्याला पाठिंबा दिला, मात्र आता या कायद्यात एफआरपी दिली की कारखानदार सुटले, अशीच तरतूद आहे. यामुळे साखरेचे दर कितीही वाढले तरी, त्याचा जादा ऊस मिळण्यासाठी काहीच परिणाम होणार नाही असा दावा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथराव पाटील यांनी केला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी एफआरपीऐवजी एमएसपी लागू करण्याची मागणी त्यांनी केली.
रघुनाथदादा पाटील म्हणाले की, आम्ही एफआरपीच्या कायद्याला विरोध केला होता. कारण त्याआधी असलेल्या किमान आधारभूत किमतीच्या अर्थात एसएमपीच्या कायद्यात शेतकऱ्यांना उसाला जादा भाव देण्याची, तसेच तो दिला नाही, तर कारखानदारांविरोधात न्यायालयात जाण्याची तरतूद होती. मात्र आताच्या कायद्यात तशी तरतूद करण्यात आलेली नाही. साखरेच्या दरवाढीतून जरी सामान्यांना फटका बसला तरी, साखरसम्राटांना प्रत्येक पोत्यामागे पाचशे रुपयांचा ऑन मनी मिळत आहे, अनेक कारखानदार साखर विक्रीचे टेंडर पास झाले की, व्यापाऱ्यांकडून प्रत्येक पोत्याला पाचशे रुपयांचा ऑन मनी घेतात. सध्या जगभरात अनेक देशांना जागतिक तापमान वाढीचा फटका बसू लागला आहे. उष्णतेच्या लाटांनी अनेक देश होरपळून निघत आहेत. यातूनच शेतीवर परिणाम होऊन शेतीमालाचे दर वाढू लागले आहेत. रंगराजन समितीची साखर आणि उपपदार्थांच्या विक्रीतून होणाऱ्या नफ्यातील ७० टक्के वाटा ऊस पुरवठादारांना देण्याची शिफारस स्वीकारली जाण्याची गरज आहे.


















