सांगली : प्रतिटन ५,५०० रुपये ऊस दरासाठी बलवडी फाट्यावर शेतकऱ्यांचे १५ तास आंदोलन

सांगली : बलवडी फाटा (ता. खानापूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत बुधवारी दुपारी चारपासून ऊस वाहतूक रोखली होती. सुमारे १५ तासांनंतर गुरुवारी पहाटे सहाला क्रांती सहकारी साखर कारखान्याने ऊस वाहतूक बंद करण्याचे आश्वासन दिले. नंतर रोखून धरलेली सुमारे ३०० वाहने सोडण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनासाठी उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले आहे. शेतकऱ्यांनी रात्रभर मुक्काम करून या आंदोलनाला पाठिंबा दिला.

बलवडी फाट्यावर अॅड. दीपक लाड, पंडित कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान परिसरातील कारखान्यांकडे जाणारी ट्रॅक्टर व ऊस वाहतूक करणारी वाहने अडवण्यात आली. पहाटे दोन वाजल्यापासून कारखाना व पोलिस प्रशासनासोबत चर्चा सुरू करण्यात आली. संदीप राजोबा, अॅड. लाड यांनी ऊस वाहतूक बंद केल्याशिवाय वाहने सोडणार नसल्याची भूमिका घेतली. अखेर क्रांती कारखान्याचे कार्यकारी संचालक आण्णासाहेब कोरे, संचालक अॅड. सतीश चौगुले यांनी वाहतूक बंद करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान, विटा पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here