सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील अंतिम ऊसबिलाची उर्वरित चार कोटी ७६ लाख २३ हजार ३१२ रुपयांची रक्कम गुरुवारी (ता. २९) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने ही रक्कम अदा केल्याने ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.गत हंगामात कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरूल आणि कारंदवाडी या तीन युनिटमध्ये मिळून १३ लाख ६० हजार ६६६ टन उसाचे गाळप करण्यात आले.
यामध्ये साखराळे युनिटमध्ये सहा लाख ८१ हजार ६५६ टन, वाटेगाव-सुरूल युनिटमध्ये तीन लाख ७३ हजार ७७४ टन, तर कारंदवाडी युनिटमध्ये तीन लाख पाच हजार २३४ टन उसाचे गाळप झाले.या तिन्ही युनिटमधील ऊसबिलापोटी कारखान्याने आतापर्यंत एकूण ४६८ कोटी ७५ लाख रुपये अदा केले आहेत. त्यापैकी अंतिम बिलाची शिल्लक असलेली चार कोटी ७६ लाख २३ हजार ३१२ रुपयांची रक्कमही गुरुवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.दरम्यान, कारखान्याचा सन २०२६-२७ चा गळीत हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.


















