सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने राजारामनगर (ता. वाळवा) येथील आरआयटी महाविद्यालयात ‘ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर आयोजित प्रशिक्षण शिबिर झाले. या शिबिराला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील यांनी ‘व्हीएसआय’ आणि ‘केव्हीके’चे शास्त्रज्ञ तसेच ऊस उत्पादकांमध्ये संवाद घडवून अनेक प्रश्नांची उकल केली. बारामती कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विवेक भोईटे यांनी मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऊस शेती अधिक शाश्वत, अचूक व उत्पादनक्षम होणार असल्याचे डॉ. भोईटे यांनी सांगीतले.
यावेळी नितीन शिंदे यांनी शेतामध्ये वापरल्या जाणाऱ्या सेन्सर तंत्रज्ञानाची माहिती दिली. अरुण पडोल यांनी अॅपच्या माध्यमातून पीक निरीक्षण, रोगनियंत्रण व उत्पादन वाढीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती दिली. प्रशिक्षणात ऊस शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञान, सेन्सर प्रणाली, मोबाईल अॅपच्या माध्यमातून पीक व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, व्हीएसआयचे डॉ. समाधान सुरवसे उपस्थित होते. विनायक पाटील, विठ्ठल पाटील, कार्तिक पाटील, प्रदिपकुमार पाटील, अतुल पाटील, शैलेश पाटील, कार्यकारी संचालक विजय मोरे, विवेक पुजारी यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वागत केले. शेती समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे यांनी आभार मानले.


















