सांगली : कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाान्याने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ऊस रोपांचे वितरण सुरू केले आहे. कारखान्याच्या या उपक्रमाला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून यावर्षी २५ लाख ऊसरोपे वितरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकरी ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना शुद्ध व निरोगी ऊसरोपांचे वितरण केले जात आहे. यंदा कारखान्याचे संचालक अमरसिंह साळुंखे, सचिव डी. एम. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील आणि सहाय्यक कृषी संशोधक विवेक पुजारी यांच्या उपस्थितीत रोपे वितरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुहास पवार, प्रकाश मगदूम, ऋषिकेश रकटे, निलेश पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शुद्ध व निरोगी बियाणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था निर्माण केली होती. हीच परंपरा राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी पुढे सुरू ठेवली आहे. सध्या २३ ते २५ दिवसांची रोपे मागणीनुसार शेतकऱ्यांना पुरवठा केली जात आहेत. शेतकऱ्यांकडून को ८६०३२ या जातीच्या रोपांना विशेष मागणी असल्याचे सांगण्यात आले. एक रोप २ रुपये १० पैसे या दराने उपलब्ध करून दिले जात आहे. सिडलिंग ट्रेमध्ये ७५ कप पद्धतीने कोकोपीट व ह्यूमिकचा वापर करून तसेच कीटकनाशक व बुरशीनाशक प्रक्रियेनंतर रोपे तयार केली जात आहेत. आडसाली लागणीसाठी या रोपांचा वापर सुरू असून पूर्वहंगामी लागणीपर्यंत पुरवठा सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


















