सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चार युनिट्सनी २०२५-२६ च्या हंगामात चांगली कामगिरी केली होती. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची उपलब्धता, वजन आणि साखर उताऱ्यात घट होण्याची शक्यता असतानाही कारखान्याने २० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदा नोंदणी झालेल्या सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्रातील उसाचे वेळेत गाळप करण्यासाठी साखराळे युनिटला दहा लाख टन, वाटेगाव-सुरुल युनिटला चार लाख टन, कारंदवाडी युनिटला तीन लाख टन आणि तिप्पेहळळ्ळी युनिटला तीन लाख टन गाळपाचे उद्दिष्ट दिले आहे. यंदा दुष्काळामुळे उसाची उपलब्धता आणि वजन घटण्याची शक्यता आहे. वाढता उत्पादन खर्च, साखर विक्री आणि उपपदार्थांच्या धोरणातील अनिश्चितता ही आव्हाने आहेत. तरीही आर्थिक शिस्त, पारदर्शकता जपत शेतकऱ्यांना समाधानकारक ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवू, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
कारखान्याच्या चारही युनिट्सकडून ऊस वाहतुकीसाठी एक हजार अंगद गाड्या, ९०० बैलगाड्या, ९०० ट्रक व ट्रॅक्टर आणि ३५ आधुनिक ऊसतोडणी यंत्रांची व्यवस्था केली आहे. वाहतूकदारांशी करारही पूर्ण केले आहेत. यंदा पाण्याची कमतरता, चाऱ्यासाठी उसाचा वापर आणि साखर उद्योगासमोरील धोरणात्मक आव्हाने लक्षात घेऊन कारखान्याने चारही युनिट्सच्या माध्यमातून गाळपाचे नियोजन केले आहे. तोडणी-वाहतूक व्यवस्था, सहवीज निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर हंगाम यशस्वी करण्याची तयारी केली आहे. कारखाना शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ व्हावी, यासाठी कारखान्याने ड्रोनद्वारे औषध फवारणीचा उपक्रम राबविला आहे. गळीत हंगामाविषयी प्रभारी कार्यकारी संचालक विजय मोरे यांनी सांगितले की, परिपक्व उसाची प्राधान्याने तोडणी आणि वाहतूक यंत्रणेचा समन्वय महत्त्वाचा आहे. हार्वेस्टर आणि वाहतूक वाहनांचे करार पूर्ण केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून खर्चावर नियंत्रण ठेवून २० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.


















