सांगली : उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दरासाठी रयत क्रांती संघटनेचा मोर्चा

सांगली : उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा, गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच दर जाहीर करावा, वजन काट्यांवरील काटेमारी रोखावी, अशा मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील कारखान्यांनी दर जाहीर न करताच गाळप सुरू केल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कारखानदारांची तातडीने बैठक घेऊन प्रतिटन दर जाहीर करण्यास भाग पाडावे, अशी मागणी करण्यात आली.यावेळी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सत्ताधारी पक्षातील दोन आमदार, किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चामुळे हा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर असल्याचे मानले जात आहे.

आंदोलक ऊस घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. आमदार खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली. कारखानदारांच्या मनमानीविरोधात हा मोर्चा आहे. गतवर्षी किलोला ४० ते ४५ रुपये असलेला साखरेचा दर आता ५५ ते ६० रुपयांवर गेला आहे. मग, त्याच प्रमाणात शेतकऱ्यांच्या उसालाही दर मिळाला पाहिजे. उसाला प्रतिटन पाच हजार रुपये आणि इथेनॉलला प्रतिलिटर ७० रुपये दर द्यावा. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. तर ‘साखरेच्या दराच्या तुलनेत उसाला योग्य दर मिळाला पाहिजे. कारखान्यांकडून होणारी काटेमारी रोखण्यासाठी वजनकाट्यांची काटेकोर तपासणी करावी अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली. आंदोलनात सागर खोत, अमोल खोत, महेश खराडे, गौतम पवार, विनायक जाधव, सुदर्शन पाटील, किरण ऊतळे, जितेंद्र सूर्यवंशी, मोहसीन पटवेकर, जयवंत पाटील, सुनील पाटील, सुनील फुलारे, धनाजी मोरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here