सांगली : येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी जयप्रकाश दत्तात्रय साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखाना प्रशासनातील अनुभव असलेल्या नेतृत्वाची भर पडली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्षपदी साळुंखे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, आमदार अरुण लाड यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाने एकदिलाने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
शेतकरी, सभासद व कामगारांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याची प्रगती गतीमान करण्यासाठी समन्वयाने कार्य करावे, असे मत व्यक्त केले.नवनिर्वाचित उपाध्यक्ष साळुंखे यांचे अभिनंदन करताना त्यांच्या अनुभव व सहकार्याचा कारखान्याच्या विकासात निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला.माजी उपाध्यक्ष दिगंबर पाटील यांच्यासह संचालक, सदस्य, कार्यकारी संचालक, सचिव, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.


















