सांगली : गत गळीत हंगामातील ऊस बिलाची थकीत रक्कम व दुसरा हप्ता मिळून प्रतिटन ५६३ रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयात जाऊन कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांना दिले. मागील गळीत हंगामात सोनहिरा साखर कारखान्याला गाळपासाठी दिलेल्या उसाचा प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या निर्णयानुसार एफआरपी अधिक १०० रुपयांप्रमाणे प्रतिटन असे २६३ रुपये बाकी आहेत. त्यामुळे २६३ रुपये आणि दुसरा हप्ता ३०० रुपये, असे एकूण ५६३ रुपये प्रतिटन तातडीने शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मागील वर्षभर साखरेला चांगला दर मिळाला असून, साखरेसह उपपदार्थांनाही उच्चांकी दर मिळत आहे. साखर विक्रीच्या बाजारात तेजी असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम देण्यास कारखान्याने विलंब करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.यंदा खत व औषधांचे वाढलेले दर, ऊसतोडणी मजुरांची वाढलेली मजुरी, वाहतूक खर्च तसेच ऊसतोडणीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक यामुळे ऊस उत्पादक आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे मागील हंगामातील ऊस बिलाची थकीत रक्कम तातडीने मिळणे गरजेचे असल्याचे संघटनेने म्हटले आहे. निवेदन देताना संदीप राजोबा, विश्वास कोळी, बाबा सांद्रे, राजेंद्र माने, मनोहर पाटील, संदीप चौगुले, बाळासो शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


















