सांगली : जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामाने गती घेतली आहे. १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू झाला असला, तरी अनेक भागांत ऊस पूर्ण परिपक्व झालेला नाही. त्यामुळे यंदा १६ साखर कारखान्यांसाठी गाळप हंगाम आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात जिल्ह्यातील कारखान्यांनी सुमारे ८० लाख टन उसाचे गाळप केले. सरासरी साखर उतारा १०.५७ टक्के राहिला, तर ८४.५७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. यंदा दुष्काळी परिस्थितीत मजूर उपलब्ध असले, तरी ऊसतोडणी, वाहतूक आणि नियमित ऊसपुरवठा यांचा ताळमेळ महत्त्वाचा ठरणार आहे. गाळपासाठी नोंद झालेल्या उसाचे क्षेत्र सुमारे एक लाख ३२ हजार हेक्टर असून, त्यापैकी ३६ हजार ८८ हेक्टर क्षेत्र आडसाली उसाचे आहे. यंदा सुमारे ९८ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा अंदाज आहे.
चालू हंगामातील ऊस उपलब्धतेबरोबरच पुढील हंगामाच्या नियोजनावरही दुष्काळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच २०२६-२७ हंगामातील इथेनॉल निर्मितीवरील केंद्र सरकारच्या निर्बंधांमुळे उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढता उत्पादन खर्च, ऊसतोडणी व वाहतूक खर्च आणि साखर विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ साधण्याचे आव्हानही कारखान्यांसमोर आहे. जिल्ह्यातील ऊस गाळपात आणि साखर उताऱ्यात नोव्हेंबरपासून सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी ऊस तोडणीसाठी जिल्ह्यात ३०० हून अधिक यंत्रे होती. यंदा त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत राजारामबापू साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आर. डी. माहुली यांनी सांगितले की, ‘दुष्काळात उपलब्ध पाण्यानुसार गाळपाचे नियोजन, उसाच्या उपलब्धतेनुसार गाळप क्षमता व दिवस निश्चित करणे, परिपक्व उसाच्या तोडणीला प्राधान्य देणे, मजूर-यंत्रे-वाहतुकीचा ताळमेळ साधणे, इथेनॉल निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पर्यायी उत्पन्नस्रोत शोधणे आणि उत्पादन खर्चाला लगाम घालून ऊसदराचे गणित जुळवणे आवश्यक आहे.’


















