सांगली : वारणा खोऱ्यातील ऊस पट्ट्यात सध्या हुमणी आणि लोकरी माव्याने जोरदार हल्ला चढवल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आणि वाढलेल्या उसावर औषध पोहोचवण्यासाठी कुरळप (ता. वाळवा) परिसरातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार आहेत. ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी करण्यात व्यस्त आहेत. यंदा पावसाने जून महिन्यामध्ये दडी मारली. जुलैच्या मध्यावर या परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे येथील बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र, ऊस पिकावर याच काळात किडींनी हल्ला चढवल्याचे दिसून येत आहे.
यंदा जून महिना संपूर्ण कोरडा गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. जुलैच्या मध्यावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने वारणा पट्ट्यात कशाबशा पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. याच संधीचा फायदा घेत शेतकरी पिके वाचवण्यासाठी औषध फवारणीची कामे करीत आहेत. हुमणी आणि लोकरी माव्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. केवळ ऊसच नव्हे, तर येथील परिसरातील भुईमूग आणि सोयाबीन सारखी नगदी पिके देखील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे सुकू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे कमी पावसाने चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला या नव्या किडींच्या निर्मूलनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.


















