सांगली : जिल्ह्यात यंदा जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहिले. विशेषतः पावसात पडलेल्या मोठ्या खंडाचा परिणाम आडसाली ऊस लागवडीवर झाला. त्यानंतर आता शेतकरी पूर्व हंगामातील ऊस लागवडीसाठी नियोजन करत आहेत. जून ते ऑगस्टदरम्यान पावसात खंड पडल्याने भूजलपातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही. आडसाली हंगामातील काही क्षेत्रावरील नियोजित लागवडही सुरू हंगामाकडे वळण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस किती पडणार यावर आगामी काळात ऊस लागवड वाढणार की नाही याचे चित्र स्पष्ट होऊ शकेल. आगामी काळात धरणातील पाण्याच्या वापरावर बंधने येण्याची शक्यता आहे. पाणी कपात, ऊस पाणीपुरवठा बंदी किंवा रोटेशन पद्धतीने पाणी देण्यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते, असे कारखानदारांनी सांगितले.
सद्यस्थितीत जिल्ह्यात आडसाली हंगामातील उसाची लागवड २७ हजार ९५४ हेक्टरवर गेली आहे. आता शेतकरी ‘पूर्वहंगामी ऊस लागवडीची तयारी करू लागले आहेत. सांगली जिल्ह्यात दोन्ही आडसाली, पूर्व हंगामात को-८६०३२, को-९४०१२, को-१५०२३ याच सर्वाधिक वाणांचा वापर केला जाते. साखर कारखान्यांकडून को-१०००१ वापरासाठी जागृती केली जात आहे. काही साखर कारखाने ‘को-२६४’ ची लागवड करु नका, असे संदेश देतात. तरीही या वाणाची शेतकरी लागवड करतात. जिल्ह्यात सर्वाधिक को-८६०३२ वाणाचीच लावगड केली जाते. परतीचा पाऊस झाला तर भूजलपातळीला आधार मिळून ‘पूर्व’ आणि ‘सुरू’ हंगामातील लागवडीला चालना मिळू शकते. मात्र, परतीचा पाऊस लांबला किंवा अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर उपलब्ध पाण्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस चांगला होण्यावरच आगामी काळातील ऊस लागवडीचा निर्णय शेतकरी घेणार आहेत. त्यावरच पुढील वर्षीच्या हंगामाची स्थिती निश्चित होऊ शकते.


















