सांगली : चालू गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदराच्या प्रश्नावरून वाळवा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची सुरुवात केली आहे. उसाला प्रतिटन पाच हजार रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. ईश्वरपूर येथील वाघवाडी फाटा परिसरात एन. डी. शुगर्स कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या काही ट्रॅक्टरना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडविले. यावेळी काही ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. तसेच ऊस वाहतूक करणारी वाहने थांबवून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पाच-सहा ट्रॅक्टरची वाहतूक रोखली
वाघवाडी परिसरात सुमारे पाच ते सहा ट्रॅक्टरमधून सुरू असलेली भरलेल्या उसाची वाहतूक रोखण्यात आली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाल्याशिवाय कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करू दिला जाणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. संघटनेच्या म्हणण्यानुसार, उसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. यासाठी चालू हंगामात प्रतिटन पाच हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
पाच हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. साखरेच्या दराबाबतही शेतकरी संघटनेने प्रश्न उपस्थित केला असून, बाजारातील साखरेच्या दराच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊसदरावरून आगामी काळात संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


















