सांगली : उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड सुरू करू देणार नाही, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र केले आहे. दत्त इंडिया साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारी वाहने बुधगाव, बिसूर आणि कुपवाड येथे आंदोलकांनी रोखली. दर जाहीर न करता ऊस वाहतूक सुरू ठेवल्यास कारखान्याचा गळीत हंगाम बंद पाडू, असा इशाराही संघटनेने दिला. ऊस उत्पादनासाठी मशागत, खते, औषधे, मजुरी, पाणी आणि वाहतुकीचा खर्च वाढला आहे. वर्षभर कष्ट करून ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वीच कारखानदारांनी दर जाहीर करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी कारखानदार आणि शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलकांनी ऊस वाहतूक रोखल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर वाहने सोडण्यात आली. मात्र, आंदोलकांनी पुन्हा ऊस वाहतूक रोखून दराच्या मागणीसाठी लढा सुरूच ठेवला. प्रशासनाने आंदोलकांवर कारवाई करण्याऐवजी कारखानदारांशी चर्चा करून दराची कोंडी सोडवावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात माजी सरपंच शिवाजी पाटील, संपत भगत, जिल्हा संघटक मनोहर पाटील, प्रमोद गोंडाजी, युवराज पाटील, सतीश पाटील, अवधूत पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
सातारा : ‘जयवंत शुगर ‘समोरील वजन काटा पाडला बंद
ऊसदर जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर कारखान्यासमोर काटा बंद आंदोलन केले. कारखाना प्रशासनाने वरिष्ठांशी चर्चा करून तीन दिवसांत ऊसदर जाहीर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने ऊसदर जाहीर करावा, या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलन केले. ऊसदराचा निर्णय जाहीर होईपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. या वेळी कारखाना प्रशासनाच्या वतीने वैभव थोरात यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
वरिष्ठांशी चर्चा करून तीन दिवसांत ऊसदर जाहीर करण्याचे त्यांनी लेखी आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेने आंदोलन स्थगित केले. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके, प्रदेशाध्यक्ष अनिल पवार, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, अर्जुन साळुंखे, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, खटाव तालुकाध्यक्ष दत्तू घार्गे, कन्ऱ्हाड उत्तर तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, पाल शाखाध्यक्ष यशवंत गोरे, वसंतराव पाटील, निखिल पाटील, शंकर पाटील, शरद जगदाळे, सनी पाटील, दत्तात्रय धोरात यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.


















