सांगली : राज्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती यंदा समाधानकारक आहे. साखरेचा विक्री दर प्रति क्विंटल ४५०० रुपयांपेक्षा अधिक असून, किरकोळ बाजारात साखर ५० रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दराने विकली जात आहे. तसेच बी-हेवी मोलॅसिसचा दर ६७ रुपये प्रति लिटर, हेवी मोलॅसिस ५५ रुपये प्रति लिटर आणि कच्च्या अल्कोहोलचा दर ६३ रुपये प्रति लिटर असल्यामुळे साखर कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मिळणाऱ्या नफ्यातून प्रति टन ७०० रुपये याप्रमाणे दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी म्हटले आहे की, गेल्या दहा वर्षात शेतीमालाच्या उत्पादन खर्चात तिपटीने वाढ झाली. यावर्षी ऊस बियाणे, मशागत, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी तसेच ट्रॅक्टर भाड्यात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली. परिणामी शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. त्यातच दोन-तीन महिन्यांत रासायनिक मिश्रखतांच्या ४० किलोच्या गोणीचे दर २५०० ते २७०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली. सध्या बाजारात साखरेचा दर प्रति क्विंटल ४,५०० रुपयांच्या घरात गेला आहे. तसेच उसाच्या उपपदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे कारखान्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रति टन ७०० रुपये दुसरा हप्ता द्यावा, असेही ते म्हणाले.


















