सांगली: पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याने यापूर्वी ३ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीमध्ये गळितास आलेल्या ३.३४ लाख टन उसाचे ११६.८७ कोटी रुपये वेळोवेळी अदा केली आहेत. आता १६ जानेवारी ते २२ फेब्रुवारी या गळीत हंगामाच्या शेवटच्या दिवसापर्यंतच्या १.३९ लाख टन उसाचे प्रतिटन ३५०० रुपयांप्रमाणे ४८ कोटी ८४ लाख रुपये ऊस बिल सोमवारी (ता. १३) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. त्यामुळे कारखान्याकडून गळितास आलेल्या संपूर्ण ४,७३,४६३ टन उसाचे १६५ कोटी ७२ लाख २३ हजार रुपये ऊस बिल शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारखान्याकडून १०० टक्के ऊस बिले अदा केली जात असल्याची माहिती अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली.
याबाबत माहिती देताना वैभव नायकवडी म्हणाले की, बँकेकडून मिळणाऱ्या उचल दरात ऊसदर देणे कठीण आहे. खर्च, तोडणी-वाहतूक खर्च, देखभाल-दुरुस्ती खर्च, बँकांचे व्याज या सर्व बाबी पाहता सध्याच्या साखरेच्या दरात हे सर्व खर्च भागविणे अशक्य आहे. ऊसदर व साखरेच्या दरात मोठी तफावत राहत असल्याने साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत आली आहे. या सर्व आर्थिक अडचणींवर मात करत कारखाना ऊस बिल अदा करत आहे. यावेळी उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, संचालक गौरव नायकवडी, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, सचिव मुकेश पवार, फायनान्स मॅनेजर सचिन शिंदे, सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.


















