सांगली : महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या निर्णायक लढाईचा आज फैसला

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा आज निर्णायक फैसला होणार आहे. गावोगावी झालेल्या बैठका, सभासदांच्या गाठीभेटी, आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि सोशल मीडियावरील प्रचारानंतर आज, दि. ९ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालय, कवठेमहांकाळ येथे मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कारखान्याची सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दि. ६ सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहा गटांतील एकूण १३ हजार ४३६ मतदारांपैकी ४ हजार ६७ मृत मतदार वगळल्यानंतर ९ हजार ३६९ सभासद मतदानासाठी पात्र ठरले होते. त्यापैकी तब्बल ७ हजार ३७१ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत ५४.८६ टक्के, तर पात्र सभासदांच्या तुलनेत तब्बल ७८.६७ टक्के मतदान झाले.

ChiniMandi WhatsApp Channel

सहा गटांमध्ये कुची गटाने सर्वाधिक ८४.८४ टक्के मतदानाची नोंद केली. या गटातील १ हजार ७०९ पात्र मतदारांपैकी १ हजार ४५० सभासदांनी मतदान केले. त्यानंतर देशिंग गटात ८०.५४ टक्के, हिंगणगाव गटात ७९.८६ टक्के, कवठेमहांकाळ गटात ७९.२६ टक्के, कर्नाटक गटात ७७.८४ टक्के, तर रांजणी गटात ७२.७९ टक्के मतदान झाले.

आरोप-प्रत्यारोपांनी रंगली निवडणूक

निवडणूक प्रचाराच्या काळात गावोगावी बैठकांचा धडाका सुरू होता. व्हॉट्सअॅप ग्रुप्सपासून प्रत्यक्ष सभांपर्यंत प्रचाराचा जोर वाढला होता. एकमेकांवर करण्यात आलेले थेट आरोप, त्यांना दिलेली प्रत्युत्तरे, दावे-प्रतिदावे आणि स्थानिक पातळीवरील रणनीती यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले.

विशेषतः सोशल मीडियावर रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली. त्यामुळे ही निवडणूक केवळ कारखान्याच्या सत्तेची नव्हे, तर संबंधित राजकीय गटांच्या प्रतिष्ठेची लढाई म्हणूनही पाहिली जात आहे.

आता प्रचाराचा आवाज थांबला असून सभासदांनी मतपेटीतून दिलेला कौल स्पष्ट होणार आहे. महांकालीच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, कोणाला सभासदांचा विश्वास मिळाला आहे आणि कोणाच्या राजकीय रणनीतीला यश आले आहे, याचा फैसला आज मतमोजणीत होणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here