सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामात ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन ५० रुपये अंतिम बिल देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय प्रत्येक शेतकऱ्याला अर्धा किलो साखर दिली जाणार आहे. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के बोनसही जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही आर्थिक लाभांची रक्कम दिवाळीपूर्वी संबंधितांच्या बँक खात्यांत जमा केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक अमोल पाटील तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजय देशमुख आणि कामगार संचालक दत्तात्रय पाटील यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नाईक म्हणाले, मागील गळीत हंगामात कारखान्याने ४ लाख ३० हजार २३५ टन उसाचे गाळप केले होते. त्यासाठी प्रतिटन ३ हजार ५०० रुपये दर जाहीर करण्यात आला होता. यापैकी प्रतिटन ३ हजार ४५० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना आतापर्यंत १४८ कोटी ४३ लाख १० हजार ७५० रुपये अदा करण्यात आले आहेत.
आता उर्वरित प्रतिटन ५० रुपयांप्रमाणे एकूण २ कोटी १५ लाख ११ हजार ७५० रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा केले जाणार आहेत. त्यामुळे कारखान्याने जाहीर केलेला संपूर्ण ऊसदर शेतकऱ्यांना मिळणार आहे.कारखान्यातील कर्मचाऱ्यांचीही दिवाळी आनंदात जावी, या उद्देशाने १० टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक अडचणींच्या काळातही कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण, वेतनवाढ, पदोन्नती यांसारख्या सुविधा दिल्या जात आहेत. तसेच रोजंदारी आणि हंगामी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याबाबतही सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे नाईक यांनी सांगितले.
मागील हंगामात कारखान्याला ऊसटंचाईचा सामना करावा लागला होता. यंदा ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील हंगामात कारखान्याला ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन अर्धा किलो साखर दिली जाणार आहे. बाजारात साखरेचे दर वाढले असले, तरी शेतकऱ्यांना प्रतिकिलो १५ रुपये या दरानेच साखर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठीच्या पावत्या लवकरच कारखान्याच्या शेती विभागामार्फत शेतकऱ्यांना वितरित केल्या जातील, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.


















