सांगली : ‘एल निनो’च्या संकटामुळे जून-जुलै महिना कोरडा जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी, जुलैअखेर कोयना धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे कृष्णा नदीतून शेतीसाठी पाणी उपशास बंदी घालण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. उपसा केला जात असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करून साहित्य जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सद्यस्थितीत धरणात केवळ ९ टीएमसी इतका जिवंत साठा आहे. शेतीसाठी पाणी उपसा बंद केल्याचा मात्र प्रचंड मोठा फटका बसणार आहे. उभी पिके वाळून जाणार आहेत.
गेल्यावर्षी धरणात १७ टीएमसी पााणीसाठा होता. शिवाय, पाऊस वेळेआधी सुरू झाला होता. मात्र आता तशी स्थिती नाही. जून महिना आणि जुलैै महिन्यातील काही दिवस कोरडे जातील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सातारा, सांगली जिल्ह्यांतील पाणी योजनांसमोर संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, ‘कोयना धरणातील ६७ टीएमसी पाणी हे वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. हे पाणी थेट समुद्राला मिळते, ते उपयोगात येत नाही. त्यातील १० टीएमसी पाणी राखून ठेवा,’ अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सिंचन योजनांसाठी ४१ टीएमसी पाणी उपसा केला गेला आहे. त्यामुळे वीज निर्मितीपैैकी काही पाणीसाठा राखीव ठेवल्यास उपयोग होऊ शकतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत नांद्रे विविध कार्य़कारी सहकारी सोसायटीचे मधुकर यादव-पाटील म्हणाले की, उपसा बंदी लागल्याचा मोठा परिणाम म्हणजे भाजीपाला, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. ऊस टिकेल का? असा प्रश्न आहे. सरकारने ऐनवेळी निर्णय घेण्याऐवजी जानेवारीपासून नेटके नियोजन केले असते तर हे संकट आलेच नसते.


















