सांगली:पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने (व्हीएसआय) ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञआनाचा प्रशिक्षण देण्यात येते. ‘ज्ञानलक्ष्मी’ प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक ऊस शेतीचे तंत्रज्ञान, उत्पादनवाढीच्या पद्धती आणि नवीन तंत्रांची माहिती मिळणार आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या शेतीसह गावातील इतर शेतकऱ्यांना करून द्यावा; असे आवाहन चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी केले. विश्वास कारखाान्यामार्फत ऊस उत्पादक महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेती प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विराज नाईक यांच्या हस्ते महिला शेतकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचे पूजन करण्यात आले. त्यांनी महिला शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणासाठी छायाताई पाटील, लीलावती माळी, विजया पाटील, सविता नाकील, शीतल मोरे, कविता मोहिते, वनिता मोहिते या महिला शेतकरी रवाना झाल्या आहेत. यावेळी संदीप पाटील, विलास उत्तरकर यांसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, विश्वास साखर कारखाान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















