सातारा : जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये ऊस तोडणी व वाहतूक कराराच्या कागदपत्रांच्या आधारे ऊस वाहतूकदारांच्या नावावर कर्ज उचलले. वाहतूकदारांच्या बिलातून कर्जाची रक्कम कपात करूनही संबंधित वित्त संस्थांकडे ती जमा करण्यात आली नाही. बनावट कर्ज प्रकरणाच्या आधारे ऊस वाहतूकदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेने केला आहे. या प्रकरणात गुंतलेल्या साखर कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
येत्या आठ ते दहा दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन वाहतूकदारांची बाजू ऐकावी, अन्यथा न्याय मिळेपर्यंत अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष राजगोंडा पाटील व सातारा जिल्हाध्यक्ष मनोजकुमार साळुंखे यांनी दिला आहे. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, काही साखर कारखानदारांनी ऊस वाहतुकदारांच्या कागदपत्रांच्या आधारे कर्जे उचलली. त्याची बिलांतून कपातही केली. मात्र, ते पैसे जमा न झाल्याने अनेक वाहतूकदारांवर कर्जवसुली, जप्ती व न्यायालयीन कारवाईची वेळ आल्याचे संघटनेने म्हटले आहे. याप्रकरणी संबंधित साखर कारखान्यांचे पदाधिकारी, जबाबदार अधिकारी व संबंधित बँक अधिकाऱ्यांवर आर्थिक फसवणूक व फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.


















