सातारा : ‘एक्झिट पोल’मध्ये यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्यावर पुन्हा जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला स्पष्ट आघाडी

सातारा : रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी (२१ जून) उत्साहात मतदान पार पडले. या निवडणुकीत तब्बल ८२.२६ टक्के मतदान झाले असून, उद्या (२३ जून) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी समोर आलेल्या ‘एक्झिट पोल’नुसार सत्ताधारी भोसले गटाचे जयवंतराव भोसले सहकार पॅनेल पुन्हा एकदा कारखान्यावर सत्ता मिळविण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सुरेश भोसले आणि आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची थेट लढत आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलशी झाली.

सातारा आणि सांगली जिल्ह्यातील एकूण 153 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदानामुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली असून, मतमोजणीनंतर कारखान्याची सत्ता कोणाकडे जाणार याकडे सभासद आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ‘पोल पंडित’ संस्थेने केलेल्या एक्झिट पोलनुसार जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला 68 ते 72 टक्के मते मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पॅनेलला सुमारे 24,500 ते 25,500 मते मिळू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

दुसरीकडे, आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलला 28 ते 32 टक्के मते मिळण्याची शक्यता असून, त्यांना सुमारे 9,800 ते 10,800 मते मिळू शकतात, असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला सुमारे 14,000 ते 14,500 मतांचे आघाडीचे मताधिक्य मिळू शकते. त्यामुळे कृष्णा साखर कारखान्यावरील सत्ता पुन्हा एकदा सुरेश भोसले आणि आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील गटाकडेच जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, अंतिम चित्र उद्या होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here