सातारा : कराड तालुक्यातील कवठे येथील प्रगतशील शेतकरी आण्णाजी सयाजीराव यादव यांनी अवघ्या सव्वा एकरात १६० टन ऊस उत्पादन मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. सद्यस्थितीला त्यांचा ऊस हा १८ ते २० कांड्यावर आलेला आहे. त्यांचा ऊस कारखान्याला जाईपर्यंत १ लाख २० हजार रुपये खर्च येईल. खर्च वजा जाता १७ महिन्यांत ४ लाख ४० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. ऊस उत्पादनासाठी त्यांनी केलेल्या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.
शेतकरी आण्णाजी यादव यांनी उसाचे पीक घेण्यासाठी शास्रोक्त पद्धत वापरली आहे. शेतात पाचट कुट्टी करून त्यांनी नांगरट केली. चार फूट सरी सोडली. ८६०३२ रोपांची लागण केली. नंतर आठव्या दिवशी आणि तीन आठवड्यानंतर अशा दोन आळवणी दिल्या. उसाला पहिली भर ८८ दिवसांनी केली. रासायनिक आणि ७५ पोती कोंबडी खत टाकून पावर टिलरने भर दिली. भर घातल्यावर ट्रॅक्टरने बेड सोडले. दोन्ही बाजूला ठिबक अंथरले. या ठिबकमधूनच अवघ्या सव्वा एकरात १६० टन उत्पादन मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यादव यांनी कीटकनाशक औषधे, आरसीएफची बॅक्टेरिया जीवामृत सोडले आहेत. सव्वा एकरात २०० लिटर जीवामृत सोडले. आता ऊस कारखान्याला जाईपर्यंत अमोनिया सल्फेट आणि पोटॅश दर पंधरा दिवसांनी सोडण्यात येणार आहे. या प्रयोगामुळे सव्वा एकरात उसाचे १६० टन उत्पादन निघेल असा अंदाज आहे.


















