सातारा : दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनावर आणि साखर उताऱ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. साखर उताऱ्यात दीड टक्के घट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी कोणते उपाय करता येतील, याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही साखर कारखान्यांनी मुदतीपूर्वी ऊस गळीत हंगाम सुरू केला आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित, साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती आणि बाजारातील साखरेची उपलब्धता या तिन्ही बाबींचा समतोल राखण्याचे आव्हान सरकारसमोर आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री देसाई म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे उत्पादन आणि साखर उतारा घटण्याची शक्यता आहे. पाण्याची समस्या उद्भवत असल्याने शेतकरी हैराण आहेत. त्यामुळे सरकारने पाणीटंचाई लक्षात घेऊन धोरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या पर्यायांवरही शासनाचा विचार सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखानदारांना निर्णय घेताना सर्व घटकांच्या हिताचा विचार करावा लागेल. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रितपणे लढण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, नऊ जागांच्या वाटपाचा तिढा आहे. यावर घटक पक्षांमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. शिवेंद्रराजे भोसले आणि मकरंद पाटील या दोन्ही नेत्यांशी समन्वय साधून निर्णय होईल, असे देसाई यांनी सांगितले.


















