सातारा : कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. सत्तारुढ सहकार पॅनल विरुद्ध संस्थापक पॅनल यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्ये आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उडी घेतली आहे. “चुकीच्या प्रवृत्तींना रोखून सत्तेचे विकेंद्रीकरण होण्यासह दडपशाहीचे वातावरण मोडून काढून ‘कृष्णा’ला पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचा करण्यासाठी संस्थापक पॅनेलला ताकदीने मदत करा,” असे आवाहन माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केले. पत्रकार परिषदेत त्यांनी परिवर्तनाची हाक दिली. समर्थकांसह कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलला पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, संस्थापक पॅनेलच्या अर्चना मोहिते उपस्थित होत्या. दरम्यान, जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ वांगी (जि. सांगली) येथे प्रचार सभा झाली. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार डॉ. अतुल भोसले, डबल महाराष्ट्र केसरी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, डॉ. पतंगराव कदम कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दिलीप सूर्यवंशी, ‘क्रांती’चे संचालक बाजीराव मोहिते, उमेदवार बाबासो शिंदे, ॲड. संग्राम पाटील, ‘कृष्णा’चे संचालक शिवाजी पाटील, माजी संचालक पांडुरंग होनमाने, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देेशमुख आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहकारी संस्था, मेडिकल कॉलेज, दूध संस्था याशिवाय राजकारण कठीण झाले आहे. परंतु कारखान्याचा वापर बेकायदेशीर पद्धतीने जिंकण्यासाठी, विरोधक संपवण्यासाठी केला जात असेल, तर हे लोकशाहीसाठी चिंताजनक आहे असे संगितले. दरम्यान, राज्यातील शिवसेना (उबाठा) पक्षातील संभाव्य फूटीमागे भाजप असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभा सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी केंद्राला दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. त्यासाठी विरोधी पक्ष फोडीचे राजकारण सुरू आहे असा आरोप चव्हाण यांनी केला. तर वांगी येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या सभेत साखर कारखानदारी सक्षमपणे चालवून, शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम कुणी सातत्याने केले असेल, तर ते डॉ. सुरेश भोसले यांनी. म्हणूनच तालुक्याची शान राखण्यास सहकार पॅनेलला विजयी करा,” असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले. येणाऱ्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी, सहकार पॅनेलला विक्रमी मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


















