सातारा : जरंडेश्वर शुगर मिल्सने पहिल्या गळीत हंगामापासूनच स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. वेळेत ऊस गाळप करण्याबरोबरच ऊस बिलाचे वेळेवर पेमेंट करण्याची परंपरा कारखान्याने कायम राखली आहे. शेतकऱ्यांना केवळ साखर उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून न राहता त्यांना अधिक चांगला दर मिळावा, यासाठी कारखान्याने डिस्टिलरी आणि को-जनरेशन प्रकल्पही कार्यान्वित केले आहेत. यंदाच्या गळीत हंगामातही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे. यावेळी २१ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा संकल्प करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस जरंडेश्वर कारखान्यालाच उस घालावा, असे आवाहन संचालक सचिन सिनगारे यांनी केले.
कारखान्याने २०२६-२७ गळीत हंगामासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे संचालक सिनगारे यांनी सांगितले. तेे म्हणाले की, कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑइलिंग व देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून, ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचेही करार पूर्ण करण्यात आले आहेत. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा करण्यासोबतच उत्तम ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. नोंदणीकृत उसाची योग्य वेळी तोडणी करून तो कारखान्यात आणण्यासाठी ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. गाळप प्रक्रियेत अनावश्यक स्टॉपेज टाळण्यावर भर देण्यात आला आहे. गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात असल्या तरी शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून जरंडेश्वर शुगरच्या धोरणावर विश्वास ठेवावा, असे आवाहन सिनगारे यांनी केले.


















