मायणी : पडळ येथील खटाव माण तालुका ॲग्रो प्रोसेसिंग प्रा. लि. या साखर कारखान्याने गेल्या सात वर्षांपासून नेटके नियोजन केल्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. दुष्काळी भागातील हा साखर कारखाना प्रगतीच्या वाटेवर आहे. यंदा कारखान्याने सात लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्ट समोर ठेवले आहे, अशी माहिती माजी आमदार तथा कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे यांनी दिली. कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या करारपत्रांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. गेल्या सात वर्षापासून सर्वांच्या सहकार्यातून कारखान्याची उभारणी करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी गळीत हंगामात सात लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त उसाचे गाळप केले जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कारखान्याचे को-चेअरमन आमदार मनोज घोरपडे म्हणाले की, कारखान्याच्यावतीने साखरेच्या उत्पादनाबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध बाबींचे नियोजन करण्यात येत असते. कारखान्याने सुरू केलेला आसवणी प्रकल्प उत्तमरीत्या सुरू आहे. तोडणी वाहतूक यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर करार करून सहकार्य करावे. कारखान्याच्यावतीने पांडुरंग मिसाळ, प्रकाश काळे, प्रकाश खाडे, धनाजी अर्जुन, भाऊ पांढरे, पांडुरंग खरात, भिमाण्णा बरकडे आदींनी कारखान्याशी वाहतुकीचा करार करुन त्यांचे पूजन करण्यात आले. संचालक संग्राम घोरपडे, संचालक सनी क्षीरसागर, जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक, शेती अधिकारी किरण पवार, मुख्य लेखापाल अजित मोरे, मुख्य रसायनशास्त्रज्ञ गोरख कदम, आसवणी व्यवस्थापक नितीन शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.


















