सातारा : आगामी हंगामासाठी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची तोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज झाली असून यंदा कारखान्याने ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले. कारखान्याच्या ५६ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी समृद्धी, सहकाराची प्रगती आणि कामगारांची मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर कारखाना नव्या भरारीसाठी सज्ज झाला आहे. आगामी हंगामासाठी कारखान्याची तोडणी व वाहतूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज करण्यात आली आहे. गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकरी, कामगार, अधिकारी व व्यवस्थापन यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मंत्री मकरंद पाटील म्हणाले, कारखान्याला अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे आणि तो टिकवून ठेवण्याचे खरे श्रेय कष्टकरी ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांना जाते. त्यांच्या सहकार्यामुळे मागील चार गळीत हंगाम कारखान्याने यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. गाळप क्षमतेपेक्षा अधिक कामगिरी करण्याची क्षमता कारखान्याने सिद्ध केली आहे. याप्रसंगी बाबासाहेब कदम, अरविंद कदम, वृषाली चव्हाण शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, संदीप चव्हाण, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, पोपट जगताप, दीपक बाबर, कुमार बाबर, राजेंद्र शिंदे, प्रमोद वारागडे, कांतीलाल पवार, राजेंद्र सोनावणे, बबनराव साबळे, अजय कदम, अरविंद कदम, अॅड. उदयसिंह पिसाळ, शशिकांत भोईटे, चंद्रकांत फडतरे, रवींद्र भोसले, प्रकाश पावशे, सत्यजीत वीर, मामा पाटील, नारायण नलवडे, सुजितसिंह जाधवराव, यांच्यासह शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दिलीप पिसाळ यांनी आभार मानले.


















