सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने ‘व्हॅट’ कराचा जास्तीत जास्त भरणा केल्याने राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या सातारा कार्यालयाकडून २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान सलग दुसऱ्या वर्षी मिळाला असून, कारखान्याची विश्वासर्हता सर्व स्तरातून वाढत असल्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी सांगितले.
प्रमोद शिंदे म्हणाले, मंत्री मकरंद पाटील यांनी कारखान्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले आहे. कोणत्याही बँकेच्या अर्थसहाय्याशिवाय मागील चार वर्षांमध्ये शेतकर्यांची ऊस बिलाची सर्व रक्कम दिली आहे. आर्थिक शिस्त आणि शासनाच्या नियमांचे पालन करून, जीएसटी, प्राप्तिकर, व्हॅट, कामगारांचा प्रॉव्हिडंड फंड आणि इतर कर नियमित भरण्यात येत आहेत. राज्य कर सहआयुक्त प्रज्ञा पांडे यांच्याकडून प्रमोद शिंदे, संचालक संदीप चव्हाण, चीफ अकाउंटंट आर. जी. उन्हाळे यांनी हे प्रशस्तीपत्र स्वीकारले. या सन्मानाबद्दल मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील व संचालकांनी कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.


















