सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद शेतकऱ्यांना माफक दरात गुणवत्तापूर्ण रोपे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निरोगी ऊस पीक, अधिक उत्पादन, साखर उताऱ्यात सुधारणा तसेच उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी केले. कारखान्याकडून दर्जेदार ऊस रोपांच्या वितरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर सुतार म्हणाले की, दर्जेदार ऊस रोपे वापरल्यास, फुटव्यांची संख्या वाढते, पिकाची वाढ एकसमान राहते आणि उत्पादन क्षमतेत वाढ होण्यास मदत होते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. याचा विचार करून कारखान्यामार्फत दर्जेदार ऊस रोपांचे वितरण सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. यावेळी सुतार यांच्या हस्ते ऊस रोपांचे वाटप करण्यात आले. जनरल मॅनेजर (केन) दादासाहेब शेळके, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील, सेक्रेटरी सिद्धेश्वर शीलवंत, सहाय्यक शेती अधिकारी अजय दुपटे, सहाय्यक ऊस विकास अधिकारी शिवाजी बाबर यांसह शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















