सातारा : कृष्णा कारखाना १०० टक्के ऊस बिले देण्यात आघाडीवर राहिला आहे. तसेच रोलर पूजन करण्यातही कृष्णा कारखान्याने राज्यात आघाडी घेतली असून, येत्या गळीत हंगामासाठी कारखाना लवकरच सज्ज होणार आहे. कारखान्याने आर्थिक शिस्त काटेकोरपणे जपली आहे. सभासदांच्या सर्व अपेक्षा सातत्याने पूर्ण केल्या जात असून, आगामी काळातही सभासदांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहेत, असे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन उत्साहात झाले. यावेळी ते बोलत होते.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते रोलरची पूजा करण्यात आली. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसवण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी भोसले म्हणाले की, सभासदांच्या आणि कामगारांच्या चांगल्या सहकार्यामुळे या हंगामात कारखान्याने विक्रमी गाळप केले. येत्या काळातही कृष्णा कारखान्याचा विकास आणि सभासदांचे हित हेच आमचे ध्येय आहे. लवकरच कृष्णा कारखान्यातील कामगारांना आणखी पगारवाढ देणार असल्याची ग्वाही चेअरमन भोसले यांनी दिली. कार्यक्रमात रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.
व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी आभार मानले. संचालक जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, वैभव जाखले, माणिकराव पाटील, संग्राम पाटील, अजित पाटील, वसंतराव पवार, जनरल मॅनेजर टेक्निकल बालाजी पबसेटवार, एम. के. कापूरकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















