सातारा : श्रीराम कारखाना बंद पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न – आमदार रामराजे निंबाळकर यांचा आरोप

सातारा : पूर्वजांच्या त्यागातून उभी राहिलेली श्रीराम सहकारी साखर कारखान्यासारखी संस्था वाचवणे आणि दहशतमुक्त फलटण करणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केले. कारखाना बंद पाडण्यासाठी विरोधकांकडून हीन राजकारण केले जात आहे. विरोधकांनी पाठीमागून राजकारण करण्यापेक्षा थेट निवडणुकीला सामोरे जावे. फलटणच्या लोकहितासाठी सर्व काही पूर्ववत स्थितीत आणणे ही आमच्या घराण्याची संस्कृती आहे आणि ती आम्ही कधीही सोडणार नाही. फलटणच्या जनतेसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि श्रीराम कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडे उपस्थित होते.

संजीवराजे म्हणाले, विरोधकांचे सर्व दावे बोगस आहेत. कारखान्याचे खासगीकरण केले जात असल्याचा खोटा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. जर विरोधकांना सहकाराचा एवढा पुळका होता, तर त्यांनी स्वतःचे खासगी कारखाने का काढले? हे सांगावे. सहकारी कारखान्याची भागीदारी खासगी संस्थेशी केली तरी त्याचे मूळ स्वरूप सहकारीच राहते, ते खासगी होत नाही. सध्या राज्यातील सर्वच साखर कारखान्यांची परिस्थिती बिकट आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने आणि सभासदांनी सुवर्णमध्य काढला होता; परंतु विरोधकांनी याला स्थगिती आणली. निवडणूक वेळेवर झाली असती तर हे सर्व प्रश्न निर्माण झाले नसते. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडे यांनी विरोधकांना खरोखरच कारखाना सुरू करायचा असेल तर भागीदारी तत्त्वावरील निर्णयाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here