सातारा : कृष्णा कारखान्याच्या सत्तेसाठी राजकीय हालचालींना वेग; मोहिते गटाला तुतारीची साथ मिळण्याची शक्यता

सातारा : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील गटाला भाजपचे पाठबळ असल्याचे मानले जात असताना, माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरत सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे. त्यांच्या या लढतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची साथ मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कऱ्हाड, वाळवा, कडेगाव, शिराळा आणि पलूस या तालुक्यांत विविध राजकीय गटांच्या हालचालींना वेग आला आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील स्थानिक नेत्यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जयंत पाटील तसेच माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या निर्णयाची उत्सुकता वाढली आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि संग्रामसिंह देशमुख यांच्या गटांची भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही.

ChiniMandi WhatsApp Channel

दुसरीकडे, जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या माध्यमातून डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कारखान्यातील सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या अप्रत्यक्ष पाठबळामुळे मोहिते गटाचे आव्हान अधिक मजबूत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता आगामी विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानली जात आहे. भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहिते गटाच्या माध्यमातून रणनीती आखली जात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक राजकारण, गावपातळीवरील समीकरणे आणि ऐनवेळी होणाऱ्या राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भोसले-उंडाळकर एकत्र येण्याच्या चर्चांना बळ

दरम्यान, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे बाजार समितीसमोर उंडाळकर गटाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर बाजार समितीत आयोजित चहापान कार्यक्रमामुळे भोसले आणि उंडाळकर गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे वर्चस्व आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here