सातारा: येथे राजारामबापू बँकेच्या कराड शाखा स्थलांतराचा कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमात कृष्णा विश्व विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले आणि राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांची उपस्थिती होती. या निमित्ताने काही महिन्यांनी होणाऱ्या कृष्णा कारखाना निवडणुकीची साखर पेरणी झाल्याची चर्चा सुरू आहे. राजारामबापू बँकेच्या कराड शाखेच्या स्थलांतर व उद्घाटन सोहळ्याने त्या नात्याला भावनिक उजाळा दिला. राजारामबापू पाटील कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील आणि कृष्णा विश्व विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर यांची प्रमुख उपस्थितीत सोहळा दिमाखात पार पडला.
सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांत कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा कारखान्याचे वाळवा तालुक्यात आठ ते दहा संचालक असतात आणि मतदार संख्याही मोठी आहे. या पार्श्वभूमीवर विनायक भोसले आणि प्रतीक पाटील यांच्यातील स्नेहभावाला विशेष महत्त्व आहे. कराड आणि वाळवा तालुक्याच्या विकासात स्व. राजारामबापू पाटील आणि स्व. जयवंतराव भोसले यांच्यासह त्यांच्या कुटुंबांचे मोठे योगदान आहे. दुसऱ्या पिढीत माजी मंत्री आमदार जयंत पाटील आणि यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी ही परंपरा जपली आहे. हे ऋणानुबंध तिसऱ्या पिढीत कायम आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष म्हणून उद्घाटक म्हणून विनायक भोसले यांची उपस्थिती या दोन्ही कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील स्नेहभाव पहावयास मिळाला.


















