सातारा : फलटण येथे पत्रकारांशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख व माजी खासदार शेट्टी यांनी साखरेच्या वाढलेल्या दराचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा अशी मागणी केली. ते म्हणाले की, सध्याच्या बाजारभावानुसार ऊस उत्पादकांना प्रतिटन सुमारे ५५०० रुपये दर मिळायला हवा, मागील वर्षी पुरवलेल्या उसासाठी अतिरिक्त १००० रुपये प्रतिटन दिले पाहिजेत. वाढलेल्या साखर दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शेट्टी म्हणाले की, ऑगस्ट २०२५ मध्ये साखरेचा दर सुमारे ३७०० रुपये प्रतिक्विंटल होता. यंदा ऑगस्टमध्ये हा दर सुमारे ६७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला. म्हणजेच वर्षभरात प्रतिक्विंटल सुमारे ३००० रुपयांची वाढ झाली. अलीकडील काळातही किलोमागे सुमारे २० रुपयांची अचानक वाढ झाली. २०२४-२५ मध्ये सुमारे २६० लाख टन, तर २०२५-२६ मध्ये सुमारे २९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. मागील हंगामातील सुमारे ५० लाख टन प्रारंभिक साठा धरल्यास देशात मोठ्या प्रमाणात साखर उपलब्ध असताना दरवाढ होण्यामागचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, श्रीराम सहकारी साखर कारखाना हा केवळ साखर उत्पादनाचा प्रकल्प नसून तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार, तसेच कारखान्यावर अवलंबून असलेल्या विविध व्यावसायिकांच्या आर्थिक जीवनाशी जोडलेला आहे. कारखाना सुरू झाल्यास ऊस उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळण्याबरोबरच वाहतूक, मजुरी, व्यापार आणि अन्य पूरक व्यवसायांना चालना मिळणार आहे. हा कारखाना बंद पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. कारखाना सुरू करण्यासाठी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी गरज पडल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव व पदाधिकारी उपस्थित होते.


















