सातारा : कराड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि जयवंत शुगर या दोन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी अदा केली आहे. याबाबत रयत क्रांती संघटनेने या दोन्ही कारखान्यांचे आभार मानले आहेत. मात्र, जिल्ह्यातील इतर अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे संघटना आक्रमक झाली आहे. आगामी आठ दिवसांच्या मुदतीत पूर्ण एफआरपी न दिल्यास संबंधित कारखान्यांवर आंदोलन करण्याचा इशारा ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी दिला आहे. याबाबत नलवडे यांनी साखर आयुक्तांना पत्र पाठवले आहे.
दरम्यान, कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि जयवंत शुगरने पूर्ण एफआरपी दिल्याबद्दल रयत क्रांती संघटनेने दोन्ही कारखान्यांच्या अध्यक्षांचा सत्कार केला. गेल्या तीन-चार वर्षे जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडण्याचे आणि शेतकऱ्यांना उच्च दर देण्याचे काम कृष्णा सहकारी साखर कारखाना सातत्याने करत आहे. कृ्ष्णा कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले व विनायक भोसले यांचा सन्मान करण्यात आला. ज्या कारखान्यांविरुद्ध संघटना ऊसदरासाठी आंदोलन करते, त्याचप्रमाणे जे कारखाने शेतकऱ्यांना चांगला दर देतात, त्यांचाही सत्कार करण्याचे काम ही संघटना करते असे सचिन नलवडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, कराड उत्तर अध्यक्ष विशाल पुस्तके, दक्षिण अध्यक्ष अशोक लोहार, अनिकेत ठोंबरे, नितीन शिर्के, संतोष कणसे, सचिन नांगरे, प्रसाद धोकटे, शंकर आतकरे उपस्थित होते.


















