सातारा : ऊस नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे ऊस कारखान्यास गळीतास आल्यानंतर १४ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना उसाचा मोबदला अदा करणे बंधनकारक आहे. परंतु राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना त्याच्या उसाचा मोबदला दोन महिने होऊनही अद्याप दिलेला नाही. अशा साखर कारखान्यांवर ऊस नियंत्रण कायद्यातील प्रचलित कायद्याप्रमाणे आरआरसीची कारवाई करावी, अशी मागणी ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य व रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी कैली आहे. याबाबत नलवडे यांनी साखर आयुक्तांना ई-मेल पाठवला आहे.
याबाबत शेतकरी नेते नलवडे म्हणाले की, शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीच्या मशागतीची कामे खोलंबली आहेत. कारखान्यानी आठ दिवसात ऊस बिले न दिल्यास रयत क्रांती संघटना आंदोलन करणार आहे. साखर कारखान्यांना बँकेकडून साखरेच्या पोत्यावरती उचल म्हणून काही रक्कम मिळत असते. तसेच साखरेच्या इतर उपपदार्थातूनही उत्पन्न मिळत असते. असे असताना कारखान्याकडून शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली गेली आहेत. शेतकऱ्यांना मार्च अखेर ऊस बिले न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेली पिक कर्जे शेतकऱ्यांना मार्चअखेर फेडता आली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर आणखी वाढणार आहे.


















