सातारा : साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाईचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार

सातारा : राज्य सरकारने साखर कारखान्यांवरील महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) कारवाईसाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना समर्पित महसूल वसुली अधिकारी म्हणून अधिकार दिले आहेत. नव्या आरआरसी कार्यपद्धतीनुसार प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधित प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर तहसीलदारांकडून संबंधित कसूरदाराला मागणी नोटीस बजावण्यात येईल. थकीत रक्कम भरण्यासाठी १४ दिवसांची अंतिम मुदत देण्यात येणार आहे. या मुदतीत रक्कम अदा न केल्यास संबंधिताच्या चल-अचल मालमत्तेवर जप्तीची कारवाई करून पुढील टप्प्यात तिचा लिलाव करण्याची तरतूद आहे. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी संबंधित कारखान्याची किंवा कसूरदाराची मालमत्ता शोधण्याची प्रक्रियाही व्यापक करण्यात आली आहे. आरआरसी प्रकरणांच्या निपटाऱ्यात प्रशासनाची जबाबदारी निश्चित होणार असून, थकीत एफआरपीच्या वसुलीला आता प्रत्यक्ष कारवाईची धार मिळण्याची शक्यता आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत एफआरपीची रक्कम वेळेत मिळावी यासाठी महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) अंतर्गत कारवाई केली जाते. आता याबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईचा प्रशासकीय दबाव वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या एफआरपीच्या वसुलीला प्रशासकीय पाठबळ मिळणार आहे. एफआरपीची रक्कम रखडल्यास त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनावर होतो. त्यामुळे वसुलीची प्रक्रिया कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष परिणामकारक ठरणे आवश्यक आहे. महसूल विभागाच्या नव्या कार्यपद्धतीमुळे प्रलंबित प्रकरणांना गती मिळाल्यास शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी सुरू असलेल्या लढ्याला प्रशासकीय बळ मिळू शकणार आहे. जिल्ह्यातील वसुली प्रक्रियेवर निवासी उपजिल्हाधिकारी थेट नियंत्रण ठेवणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत वसुलीचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा आढावा नियमितपणे घेऊन त्यातील दिरंगाई दूर करण्याची यंत्रणा निर्माण होणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here