सातारा : यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना आगामी गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे. कारखान्याची गाळप क्षमता गेल्या हंगामात प्रतिदिन ७ हजार ५०० मेट्रिक टनांवरून ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्यात आली असून, यंदा दररोज ११ हजार मेट्रिक टनांहून अधिक ऊस गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगामाची आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वाढीव गाळप क्षमतेच्या पार्श्वभूमीवर ऊसतोडणी आणि वाहतूक यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली असून, शेतकऱ्यांचा ऊस वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारखान्यापर्यंत आणून त्याचे गाळप करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली आहे.
दरम्यान, ऊसतोडणी-वाहतूक यंत्रणेसह ऊसतोडणीच्या टोळ्यांचे कारखाना कार्यस्थळावर तसेच शेती विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये आगमन सुरू झाले आहे. संबंधित विभागांमध्ये यंत्रणा उभारण्याचे आणि कार्यान्वित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी कारखाना प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. वाढीव गाळप क्षमतेचा पूर्ण क्षमतेने वापर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
कारखाना प्रशासनाने सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना त्यांनी नोंदविलेला ऊस सह्याद्री कारखान्याकडेच गळितासाठी पाठवावा, असे आवाहन केले आहे. ऊसतोडणी-वाहतूक यंत्रणा संबंधित विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात उभारण्याचे काम सुरू असताना यशवंतनगर विभागीय कार्यालयाचे प्रमुख वाय. पी. साबळे, तसेच फिल्डमन एम. एच. मोरे, एस. वाय. पवार, संजय चव्हाण, डी. जी. सरगडे, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र पाटील, वायदंडे, आतकरे आदी उपस्थित होते.


















