सातारा : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ७००० मृत मतदार वगळता सरासरी ८२.२६ टक्के मतदान झाले. कारखान्याच्या ४३,२५५ मतदारांपैकी ३५ हजार ५५७ मतदारांनी हक्क बजावला. सत्ताधारी सहकार पॅनेल आणि विरोधी संस्थापक पॅनेलमध्ये थेट लढत झाली. सहकार पॅनेलचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले करत आहेत. संस्थापक पॅनेलचे नेतृत्व कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, त्यांच्या पत्नी अर्चना मोहिते यांच्याकडे आहे. प्रचाराच्या १० दिवसांत प्रचारसभा, रॅली, भेटीगाठींनी रंगत आली होती. त्या पार्श्वभूमीवर मतदानावेळी चार तालुक्यांतील गावागावांत उत्साह पाहायला मिळाला. उद्या, मंगळवारी (ता. २३) मतमोजणी होणार आहे.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. भोसले, विनायक भोसले, उत्तरा भोसले, गौरवी भोसले, अविनाश मोहिते, अर्चना मोहिते यांनी रेठरे बुद्रुक येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. वाठार येथील केंद्रावर ओळखपत्रावरून उडालेला किरकोळ गोंधळ वगळता सातारा, सांगली जिल्ह्यांतील कऱ्हाड, वाळवा, कडेगाव, खानापूर तालुक्यांतील १३० गावांत शांततेत मतदान झाले. मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात होता. मतदानाच्या दिवशी सर्व प्रक्रिया शांततेत, शिस्तीत आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाली. वाठार येथे ओळखपत्राच्या मुद्द्यावरून किरकोळ वाद झाला. त्यावर दोन्ही गटांनी समजुतीची भूमिका घेत पडदा टाकला. मतदान केंद्रांवर सभासदांच्या रांगा होत्या. दुपारी दोनपर्यंत ६० टक्के, तर त्यानंतर मतदान थंडावले होते. चारच्या सुमारास पुन्हा मतदार मतदानासाठी बाहेर पडले. रेठरे बुद्रुक, वडगाव हवेली, वाठार, काले आदी गावांत गर्दी झाली होती. त्यामुळे सरासरी ८२.२६ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले.


















