साातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शहापूर फाटा, इंदोली फाटा, वाठार येथे ऊस वाहतूक रोखून धरली. त्यामुळे विविध साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक खोळंबली. आंदोलनाची तिव्रता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने यात तोडगा काढण्यासाठी कारखनदारांच्या प्रतिनिधींना आंदोलनस्थळी बोलवण्यात आले. तेथे कृष्णा कारखाना, सह्याद्री कारखाना जयवंत शुगर या तीन कारखान्यांचे अधिकारी त्या ठिकाणी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचे आवाहन केले. त्यावेळी ऊसदराचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत नवीन ऊस तोडी न करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर कारखानदारांकडून नवीन ऊसतोड बंद करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच वाहने सोडण्यात आली. त्यानंतर ऊस तोडी बंद करण्यात आल्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदर जाहीर केल्याशिवाय आणि नवीन ऊस तोडी बंद केल्याशिवाय कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. संघटनेने कारखान्यांची ऊस वाहतूक रोखून धरली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय झाला. यावेळी कारखाना प्रशासनकडून आजपासून नवीन ऊस तोडी न करण्याचे लेखी निवेदन संघटनेच्या पदाधिकारी यांना देण्यात आले. त्यानंतर रोखून ठेवलेले ऊस वाहतुकीची वाहने सोडण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, राजू शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कऱ्हाड उत्तर तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, रामचंद्र साळुंखे, अर्जुन साळुंखे, विक्रम कदम व सहकारी आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, कऱ्हाड येथे भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार राज्यमंत्री भोयर यांनी याची भेट घेतली. त्यांनी साखरेची किमान विक्री किंमत वाढविण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारसोबत दिल्लीत बैठकीसाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज पवार, प्रदेश उपाध्यक्ष महेश खराडे, किसान मोर्चाचे सचिव भगवान काटे, सावकार मदनाईक, तानाजी थोरात, उमेश मुळे उपस्थित होते.


















